विधानसभा निवडणूक -२०२४ – निवडणूक आयोग
बीड (दि.१७) : निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांचा समावेश नसावा. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात, दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
शस्त्र जमा करण्याची कार्यवाही
शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा करणे आवश्यक असल्याने आचारसंहिता कालावधीत सदरील शस्त्रे जमा करावीत. तसेच आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर संबंधितांना त्यांची शस्त्रे परत करण्याची कार्यवाही पोलिस विभागाने करावी. यामध्ये बँक, महत्त्वाची कार्यालये, संस्था, विद्युत केंद्र व इतर महत्त्वाची कार्यालये यांच्याकडील शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून सदरील शस्त्रांबाबत कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद आहे.
