🔷 रेल्वे प्रवास
🔷 राज्यराणीच्या आजच्या प्रवासांत थांबा बदल
नांदेड : नांदेड हुन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आज महत्त्वपूर्ण बदल लक्षात घ्यावयास हवा. आज धावणाऱ्या नांदेड-सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेसच्या (गाडी क्रमांक १७६११) मार्गात बदल करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी ही गाडी नाशिक रोड व इगतपुरी स्थानकावर न थांबता थेट सीएसटीएम मुंबईकडे धावेल. नियमित वेळेनुसार पहाटे ६:१२ मिनिटाला ही गाडी नाशिक रोड तर ७:१३ मिनिटाला ईगतपुरी रेल्वे स्थानकावर येत असते.
१९ ऑक्टोबर रोजी सुटणारी ही रेल्वे या दोन्ही रेल्वे स्थानकावर थांबणार नाही. गाडी या दोन स्थानावर थांबण्याचे कारण अद्याप कळाले नाही. हुजूर साहेब नांदेड येथून दररोज रात्री ८ वाजता सुटणारी नांदेड- सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सीएसटीएम स्थानकावर पोहचते. या प्रवासा दरम्यान, १५ स्थानकांवर गाडीचा थांबा आहे. मात्र आज सुटणारी गाडी नाशिक आणि ईगतपुरी स्थानकावर थांबणार नाही, असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सूचित केले आहे.
🔺 गाड्यांची संख्या वाढली सुविधा वाढल्या पण सातत्याने होणारे वेळापत्रकातील आणि मार्गातील बदल प्रवासी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस क्रमांक (१७४०९-१७४१०) मुदखेड-नांदेड- मुदखेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. तर नरसापुर -नगरसोल च्या गाडीत वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. परंतु हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नरसापूर-नगरसोल गाडी क्रमांक (१७२३१) आपल्या जुन्याच वेळापत्रकानुसार धावेल, यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे विभागाने कळविले आहे. ही गाडी तेलंगण राज्यात असलेल्या नरसापूरहून प्रत्येक शुक्रवारी व रविवारी सकाळी ११:१५ वाजता स्थानकावरून सुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता ही गाडी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील नगरसोल स्थानकावर पोहचते. नगरसोल वरून साईनगर शिर्डी हे अंतर जवळ आहे. अनेक भाविक येथे उतरून रस्ते मार्गाने साईनगर शिर्डी कडे जात असतात.