🔺विधानसभा २०२४ 🔺 परळी मतदारसंघ
🔷 राजेभाऊ फड यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

बीड-परळी-वैजनाथ – 233 परळी विधानसभा मतदारसंघात 122 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील स्वरूपाचे आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतून हे दिसून आलेले आहे. त्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येऊन सुद्धा त्यावर प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत या सर्व मतदान केंद्रावर बोगस मतदान होण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्व संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा पुरवली जावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यावर निर्वाळा देत असताना न्या.एस.जी.चपळगावकर व न्या.विभा कंकणवाडी यांच्या न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने याबाबत येत्या दोन दिवसांत त्यांचे स्पष्टीकरण आणि शपथपत्र सादर करावे व त्यावर काय उपाययोजना केल्या याबाबत कोर्टाला अवगत करावे असे आदेश दिले आहेत.
परळी विधानसभा निवडणूक ही लोकशाही पद्धतीने आणि निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच अनुचित प्रकार घडू नयेत अथवा बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होतांना दिसत नाही.
याच कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 11877 दाखल केली आहे. यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला येत्या दोन दिवसांत स्पष्टीकरण आणि शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला चपराक बसली आहे. मतदारसंघातील 122 बूथ बद्दल योग्य ती उपाययोजना करून लोकशाही पद्धतीने आणि निर्भय वातावरणात निवडणूक घ्या असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

