बंद करा रक्ताची होळी, साजरी करू विकासाची दिवाळी!

विधानसभा निवडणूक २०२४ 🔶२३३ परळी विधानसभा

🔷 पत्रकार परिषदेतून राजेभाऊ फड यांचा पालकमंत्र्यांवर घणाघात

बीड/परळी वैजनाथ -(प्रतिनिधी)-परळी विधानसभा मतदारसंघातील वातावरण अतिशय दूषित आणि गढूळ करून ठेवले आहे. मतदारसंघातील जनता दहशतीखाली वावरत असून, दादागिरी आणि मारामारी हे नित्याचे झाले आहे. प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करणे, भ्रष्टाचार करण्याचे प्रकार आता पालकमंत्र्यांनी सोडून द्यावेत म्हणून मी त्यांना रक्ताची होळी सोडून द्या, सकारात्मक विचार घेऊन, सर्वांना सोबत ठेऊन विकासाची दिवाळी साजरी करू असे आवाहन करतो आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी केले. रविवार, दि.27 ऑक्टोबर रोजी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी रविवारी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. परळी विधानसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील असलेल्या 122 बूथ संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन त्याचा नुकताच निकाल राजेभाऊ फड यांच्या बाजूने लागला. यात निवडणूक आयोगाने न्यायालयाला शपथपत्र सादर केले असून त्यात निवडणूका निर्भय वातावरणात लोकशाही पद्धतीने घेण्यात येतील अशी खात्री दिली आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राजेभाऊ फड यांनी केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक गैरप्रकार घडले होते. काही केंद्रांवर फक्त बोटाला शाई लाऊन मतदान न करू देता मतदारांना परत पाठवण्यात आले. मोजक्याच लोकांनी बंद खोलीत बटणे दाबून बोगस मतदान केले होते. मतदान केंद्रांवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे गैरप्रकार करण्यात आले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता बोगस मतदानाचे गैरप्रकार यापुढे अजिबात घडणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत मध्यम प्रतिनिधींनी ऐन वेळी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देत असताना राजेभाऊ फड यांनी विविध मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत शपथपत्र सादर करतांना कृषिमंत्र्यांची संपत्ती फक्त 20 कोटी होती आता ती तिप्पट होऊन 60 कोटींवर आली. म्हणजेच मागील पाच वर्षांत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून माया जमवली आहे. मतदारसंघातील दहशतीचे वातावरण बंद झाले पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने जो उमेदवार या निवडणुकीत असेल तो उमेदवार स्वतः ते आहेत असे समजून सर्वजण काम करणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुखांना आणि इतरही पक्षाच्या प्रमुखांना भेटून या निवडणुकीत आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती मी स्वतः भेटून त्यांना करणार असल्याचेही राजेभाऊ फड म्हणाले.

यापुढे बोगस मतदान होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील असलेल्या १२२ बूथ संदर्भात याचिका दाखल केली होती. यावर निवडणूक आयोगाने शपथपत्र देऊन योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. १८२ मतदान केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा उभारण्यात येणार असून, बाहेरच्या राज्यातील आयएएस व आयपीएस अधिकारी निरीक्षक म्हणून काम पाहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे बोगस मतदान होण्याचे प्रकार घडणार नाहीत तसेच प्रशासनानेही याची दक्षता घ्यावी असे राजेभाऊ फड यांनी म्हटले आहे.