🔶 परंपरा🔺 सण -उत्सव 🔺Maharashtra news connect महाराष्ट्र न्यूज कनेक्ट
बीड- परळी वैजनाथ: शहरातील गवळी समाज बांधवानी फुले, मोरपिसांनी सजवून लोकवाद्याच्या तालावर रेड्यांचा मिरवणूक काढली ही अनोखी परंपरा पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
शहरात दिवाळी पाडव्याच्या औचित्यावर रेड्यांना फुले आणि मोरपिसांनी सजवून फटाक्यांच्या निनादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
सध्या दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून शनिवारी दिवाळी पाडव्याच्या मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. अशातच वर्षभर दूध देणाऱ्या जनावरांना फुले आणि मोरपिसांनी सजवण्यात आलं. तसंच हलगी सारख्या लोकवाद्याच्या तालावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाकेही वाजवण्यात आले.
या उत्सवात गवळी समाजाकडून पशूंना फुले आणि मोरपीसांनी सजवण्यात आलं होत. तसंच त्यांच्या अंगावर विविध स्टाईलची कटिंग करत, शरीरावर तसेच शिंगांवर विविध रंग लावण्यात आले. हलगी आणि ताशा पथकाच्या तालावर रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा शहरात साजरी केली जाते.राज्यात बलिप्रतिपदा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केली गेली. त्यानिमित्ताने राज्यभरातील गवळी बांधव आणि नागरिकांनी त्यांच्या गोधनाची पूजा केली, त्यांच्या मिरवणुका काढल्या. राज्यातील विविध भागात विविध प्रथा पाळल्या जात आहेत. काही ठिकाणी म्हशींच्या शर्यतीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.
हा उत्सव म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसेच त्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात. यात आकर्षक सजलेल्या रेड्यांच्या मालकांचा सत्कार देखील करण्यात येतो.
🔶 जनावरांप्रति स्नेहभाव : हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे आणि या दिवाळीत पाडवा आणि भाऊबीजेला जनावरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. ज्याचं वर्षभर आम्ही दूध विकतो आणि आमचा संसार चालतो अशा जनावरांचं ऋण फेडण्यासाठी अश्या मिरवणूक आणि रेड्याच्या स्पर्धा राज्यातील विविध भागांत साजऱ्या केल्या जातात.