🔶 पोटनिवडणूक कार्यक्रमात बदल
🔶 केरळमधील कल्पती रथोत्सवम तर 🔶 पंजाबमध्ये श्री गुरुनानक देव यांची ५५५वी जयंती.
नवी दिल्ली : गुरुनानक जयंती अर्थात प्रकाशपर्व व इतर सण लक्षात घेता उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळातील १४ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदान १३ ऐवजी २० नोव्हेंबरला घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.महाराष्ट्र व झारखंड विधानसभेसोबत होणाऱ्या अनेक राज्यांतील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मोठा बदल केला आहे. भारत निर्वाचन आयोग उत्तर प्रदेशात ९, पंजाबमध्ये ४ आणि केरळात विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीसोबत हा कार्यक्रम
जाहीर केला; पण काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष (बसप) आणि राष्ट्रीय लोक दलासह विविध राजकीय पक्षांनी निवडणूक वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली. ऐन सणासुदीत मतदान घेतल्यास नागरिक मतदानाकडे पाठ फिरवू शकतात. त्यामुळे मतांचा टक्का घसरू शकतो, असा तर्क या राजकीय पक्षांनी दिला होता.
केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघातील नागरिक १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान कल्पती रथोत्सवम सण साजरा
करतात. तर पंजाबमध्ये श्री गुरुनानक देव यांची ५५५वी जयंती अर्थात प्रकाशपर्व १५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने १३ नोव्हेंबरपासून अखंड पाठ वाचन केले जाते. उत्तर प्रदेशात कार्तिक पौर्णिमेपूर्वी ३ ते ४ दिवस लोक यात्रा करतात. यंदाची कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगास मतदान कार्यक्रम बदलण्याचा आग्रह विविध राजकीय पक्षांनी केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब व केरळातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान १३ ऐवजी २० नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यातील १४ जागा वगळता उर्वरित विधानसभेच्या ३३ व वायनाड तथा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान ठरल्यावेळी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच मतमोजणीसुद्धा निर्धारित २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मीरपूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, सिसामऊ, फूलपूर, कटेहरी आणि माझवाँ या नऊ तर पंजाबमध्ये डेरा बाबा नानक, छब्बेवाल, गिड्डेरबाहा आणि बर्नाळा या चार मतदारसंघांत विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे.