इव्हीएम यंत्रांचे द्वितीय सरमिसळीकरण पूर्ण

🔷 विधानसभा निवडणूक 2024🔺 निवडणूक आयोग
बीड-– महाराष्ट्र न्यूज कनेक्ट नेटवर्क (एम एन सी एन)- जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या इव्हीएम यंत्रांचे द्विती य सरमिसळीकरण प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली.
जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात पाठविण्यात येणाऱ्या इव्हीएम यंत्रांचे रॅन्डमायझेशन (यादृच्छिकीकरण) पद्धतीने सरमिसळीकरण करण्यात आले.

ही प्रक्रिया गेवराई, माजलगावच्या निवडणूक निरीक्षक लालटनपुई वाँगचाँग, बीड व आष्टीचे निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रताप सिंह, केज व परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सुनील अंचिपका, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सहाही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री सतीश धुमाळ, गौरव इंगोले, श्रीमती कविता जाधव, श्रीमती वसिमा शेख, दीपक वजाळे व अरविंद लाटकर यांची उपस्थिती होती. या प्रक्रियेचे अवलोकन करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारही उपस्थित होते. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांना या प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सविस्तर माहिती दिली. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांनीही या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त केले.

ही प्रकिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख, तंत्रज्ञ विश्वजीत लांडगे, एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी भाऊसाहेब बांगर, महादेव भोकरे, तानाजी हंगरगेकर यांनी परिश्रम घेतले.

🔶 परळीत एक, माजलगावात तीन बॅलेट युनिट
या प्रक्रियेत पाच हजार ८३८ बॅलेट यूनिट, दोन हजार ९४७ कंट्रोल यूनिट आणि तीन हजार १८९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे सरमिसळीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ परळी मतदारसंघात एक बॅलेट युनिट प्रति मतदान केंद्रांवर लागणार आहे. तर माजलगाव मतदारसंघात प्रति मतदान केंद्रांवर तीन बॅलेट युनिट लागणार आहेत. गेवराई, बीड, आष्टी व केज या मतदारसंघात प्रति मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे बॅलेट युनिट लागणार आहेत. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदान केंद्रांच्या संख्येनुसार १२० टक्के प्रमाणात मतदान यंत्रे पुरविली गेली असल्यामुळे मतदान यंत्रांची कसलीही कमतरता नसल्याचे निवडणूक विभागाने कळवले आहे.