अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत परळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर दोन युवकांचा मृत्यू

परळी/प्रतिनिधी अज्ञात वाहनाने ऑटोला दिलेल्या धडकेत परळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दि.०७ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री अपघात झाला आहे.या अपघातात दोन तरुणांचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील उड्डाणपूलावर मंगळवारी (दि. 7) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने ऑटो रिक्षातील दोघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटोरिक्षाचालक राजेश सखाराम पोटभरे ( २५, रामनगर, परळी) व आशिष अनुरथ ताटे (23, रा. भीमनगर, परळी) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी राजेश पोटभरे आणि आशिष ताटे हे पहाटे ऑटोरिक्षातून इटके चौकमार्गे परळीला जात होते. दरम्यान, उड्डाणपूलावर अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जोराची धडक दिली. त्यामुळे ऑटोरिक्षातील राजेश आणि आशिष यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आज दुपारी सखाराम पोटभरे ( रा. मालेवाडी परळी ) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महिंद्र ठाकूर हे करीत आहेत.