२१५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
बीड- (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण १० उपकेंद्रामधून सकाळच्या सत्रात १० ते १२ वाजता व दुपारच्या सत्रात ०३ ते ०५ वाजता अशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण तीन हजार ५१ उमेदवार बसलेले आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी १० उपकेंद्र प्रमुख, ११ मदतनीस, ४७ पर्यवेक्षक, १४७ समवेक्षक असे एकूण २१५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाद्वारे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा केंद्रप्रमुख शिवकुमार स्वामी यांनी या परीक्षेच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण दिले. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांचेकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारांना जेवणाचा डब्बा, अल्पोपहार व पाण्याची बॉटल घेऊन येण्यास परवानगी देण्यात येत आहे. दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमून दिलेले परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वतः चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व प्रत्येक सत्राकरीता त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांचे परीक्षा उपकेंद्रावर पेपर क्रमांक ०१ सकाळ सत्रामध्ये सकाळी ०८.३० वाजता व पेपर क्रमांक ०२ दुपार सत्रामध्ये दुपारी ०१.३० वाजता उपस्थित रहावे.
सकाळचे सत्रात ९.३० वाजता नंतर व दुपार सत्रात २.३० वाजता नंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश देण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री.स्वामी यांनी कळविले आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2024/10/महत्वपूर्ण-ताज्या-घटना-घडामोडी-प्रवास-पर्यटन-स्थळे-खाद्यसंस्कृती-नोकरी-याची_20241001_091754_0000.jpg)