🔶निवड
बीड/परळी वैजनाथ, एम एन सी न्यूज नेटवर्क- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती इत्यादीचा विकास घडविण्याकरीता, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ‘अमृत’ संस्थेवर परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अमृत संस्थेच्या नियामक मंडळाच्या दिनांक १९/०४/२०२३ रोजी झालेल्या बैठकीमधील मुद्दा क्रमांक १३ नुसार सल्लागार समिती, निवड समिती किंवा इतर आवश्यक त्या कार्यासाठी, आवश्यक त्या विषयांच्या समित्या नेमण्याचे व त्यांच्या वेळोवेळी बैठका घेणे, याचा अधिकार व्यवस्थापकीय संचालक अमृत यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी सदस्यांची नियुक्ती करून अमृत विकास सल्लागार समितीची स्थापना केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत कार्यालयीन आदेश आज दि.६ डिसेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करणारे बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे परळीचे माजी नगराध्यक्ष व परळी वैजनाथ येथील विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत आहेत. तरुण नगराध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द निर्माण केलेली आहे.विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून त्यांचे राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेले आहे. त्याचबरोबर परळी येथे झालेल्या राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे ते संस्थापक आहेत. त्यांचे सामाजिक कार्य व क्षमता लक्षात घेऊन त्यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेवर सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीवर श्री. विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक, अमृत, पुणे. हे अध्यक्ष असुन डॉ. प्रिया देशपांडे, निबंधक, अमृत, पुणे सदस्य सचिव म्हणून काम करतील. सल्लागार सदस्य म्हणून बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह क्षितिज पाटुकले, निखिल लातूरकर,विश्वजीत देशपांडे पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व नवनियुक्त सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
● *’अमृत’ च्या माध्यमातून गरजूंना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*
दरम्यान, या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की,ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था /महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारंसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम इत्यादी राबविण्यात येवून व इतर माध्यमातूनही विद्यार्थी, युवक-युवती इत्यांदीचा विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गरजूंना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु असा विश्वास बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.