आज बेळगावात केएलई कॅन्सर रुग्णालयाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

🔶आरोग्य  🔶 कॅन्सरवर उपचार  🔶३०० खाटांची व्यवस्था 

बेळगाव : केएलईच्या डॉ. संपतकुमार एस. शिवनगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. ३ रोजी होत आहे. हा सोहळा ३० डिसेंबर होणार होता.मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर हा सोहळा आज शुक्रवारी दुपारी ४ वाजता होत असून  उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल.अशी माहिती केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.

या उद्घाटन कार्यक्रमास राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, आ. राजू सेट, आ. अभय पाटील, काहेरचे कुलगुरू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमस्थळी पाण्याच्या बाटल्या, हँडबॅग, छत्री, मोबाईल आणि इतर
वस्तू आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. कार्यक्रमाला दुपारी ३ पर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले आहे.

केएलई कॅन्सर हॉस्पिटल मुळे आता बेळगावात रेडिओथेरपी, किमोथेरपीसह कॅन्सरसंबंधीचे सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये  ३०० खाटांची व्यवस्था आहे.