🔺घरफोडी; ८ लाखांचा ऐवज लांबवला🔺घटनास्थळी पोलिसांनी भेट
बीड/अंबाजोगाई– शहरातील नागझरी परिसरातील श्रीराम कॉलनी येथे चोरट्यांनी एका घराच्या चॅनल गेटमधून आतमध्ये प्रवेश करत बेडरूममधील कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वर्दळीच्या नागझरी परिसरातील कॉलनीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रकांत नारायण सूर्यवंशी (६५) श्रीरामनगर, नागझरी परिसर, अंबाजोगाई यांनी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार, २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत चोरट्यांनी सूर्यवंशी यांच्या घराच्या गेटचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत बेडरूममधील कपाट फोडले. त्यातील २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे पाच तोळ्यांचे लॉकेट, ७२ हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ, ८० हजारांचे मिनी गंठण, ८८ हजार रुपयांची सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच इतर सोन्याचे दागिने व नगदी ३ लाख रुपये असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.