हवामान खात्याने वर्तविला अवकाळी पावसाचा अंदाज

पुणे:- उन्हाळ्यात हवामान खात्याने वर्तविला अवकाळी पावसाचा अंदाज अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. कोल्हापूर, सातारा, नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी याठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गारगोटी इथल्या मार्केटमध्ये पाणीच पाणी झाले होते. यामुळे येथील व्यापाऱ्यांचं नुकसान झाले. आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. साताऱ्यातील अनेक भागात पाऊस मुसळधार पाऊस झाला.  साताऱ्यातील वाई खंडाळा तालुक्यासह महाबळेश्वरच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.  महाबळेश्वर, खंडाळा, लोणद भागासह सातारा शहरातही पाऊस झाला. संपूर्ण साताऱ्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

पुण्यात सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, डेक्कन, औंध, पुणे विद्यापीठ परिसरात पाऊस झाला. अचानक पाऊस आल्याने पुणे करांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. मुंबईतही अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस झाला.

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. नवापूर, नंदुरबार, तळोदा, धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, केळी आणि पपईसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे पूर्ण नुकसान होण्याची शक्यता आहे.  कर्मचारी संपावर गेल्यामुळे आधीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यात आता आणखी एकदा अवकाळी पाऊस आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.

(संग्रहित छायाचित्र)