🔺2025_विशेष लेखमाला 03
🔷 रोड रेंज, रस्ते अपघात
रस्ते अपघातात होणारी हानी जितका मोठा चिंतेचा विषय आहे त्या पेक्षा अधिक गंभीर विषय म्हणजे ‘रोडरेज’ अर्थात रस्त्यावर होणारी वाहनधारकांमधील भांडणे हा आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या प्राणहानी आणि वित्तहानी पलीकडे अधिक हानीचा धोका ‘रोड रेज’ मधून आहे.
या प्रकारच्या रागाच्या प्रदर्शनातून हाणामारी पासून दंगलीपर्यंत उदाहरणे आहेत, अशा घटना रस्त्याची शिस्त तर बिघडवितात, सोबत समाज जीवनावर देखील याचा परिणाम होत असतो.
रोड रेज च्या बाबत, .. कारण अगदी किरकोळ असतं पण होणारा गोंधळ आणि राडा खूप मोठा असतो… हॉर्न का वाजवला ? धक्का का दिला ? साईड का नाही दिली अशा स्वरूपाच्या किरकोळ कारणांवरून रस्त्यात धक्का-बुक्की पाहून मारामारी, वाहनाच्या काचा फोडणे प्रसंगी वाहन पेटवून देणे असे प्रकार घडतात.
रोड रेज आणि वाहतूक याचा तसा दार्शनिक असा संबंध दिसत असला तरी यामागे मुळ कारण असतं ते मानवी स्वभाव आणि मानवी अहंकार (EGo). यामागे काही प्रमाणात रस्त्यात वाहतुक कोंडीत खूप काळ अडकावे लागले तर वाहनचालक आपले मानसिक संतुलन गमावतात आणि “वड्याचे तेल वांग्यावर” व्हावं तसा काहीसा प्रकार रस्त्यावर होणाऱ्या या रागाच्या घटनातून समोर येतो. अर्थात या रागामागे त्राग्याचे कारण नक्की असते.
रोड रेजचे प्रकार शहरागणिक बदलताना आपणास दिसतात. ज्या महानगरात अधिक वाहतूक आहे आणि सिग्नल यंत्रणा आहे अशा शहरात सिग्नल यंत्रणेचा वेळ आणि गर्दी याची वाहनधारकांना सवय झालेली असते आणि आपल्याला इथं वाट बघण्याखेरीज पर्याय नाही अशी मानसिक तयारी देखील झालेली असते त्यामुळे महानगरात असे प्रकार आभावानेच घडतात.
छोटया शहरांमध्ये काहीसा वेगळा अनुभव आपणास घेईल अशा ठिकाणी वाहतूक शिस्त, एकेरी मार्ग वाहतूक आदी धाब्यावर बसवून वाहने हाकण्याची एक प्रकारची स्पर्धा आपणास दिसते. अशा भागात मोठा आवाज करणारे प्रेशर हॉर्न (भोंगे) तसेच फटाके वाजविणारे सायलेन्सर आदी वापरण्याची स्पर्धा युवकांमध्ये दिसते. यावर नियंत्रण नसेल तर मात्र रोड रेज चा प्रकार हमखास दिसतो.
ज्या भागात वाहतुकीची शिस्त नाही किंवा शिस्त काय आहे हे माहिती नाही अशा भागातील वाहनचालक महामार्गावर देखील त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात आणि या स्पर्धेतून रोड रेज व त्यापुढील गंभीर प्रकार घडताना दिसतात.
आपला राज्यात छोटया गावात केवळ रोडरेजमुळे जमाव गोळा करून मारामारी व पुढे दंगल त्यातून संचारबंदी असे प्रकार घडलेले आपण बघितले आहेत. रस्ता हा केवळ आपला नाही. ज्याला घाई आहे त्याला प्राधान्य द्यायला हवे, कुणी जाणीवपूर्वक धक्का देत नाही. हे समजून घ्यायला हवे. वाहनाच्या ब्रेक पेक्षा मनाचा ब्रेक लावायला हवा तरच रोडरेज’ कमी होईल.
( प्रशांत विजया अनंत दैठणकर )