🔷 ह्या आहेत वाळवलेल्या पोळ्या. तुमच्या भागात या पदार्थाला काय म्हणतात नक्की सांगावे.
🔷पोळ्या भरपूर उरल्या असतील तर हे नक्की करून ठेवा.
अमरावती. आमच्या भागातील हा आवडीचा पदार्थ आहे..तरीसुद्धा हा भन्नाट मेनू बऱ्याच जणांना माहिती नाही त्यामुळे हा प्रपंच खास त्यांच्यासाठी..
तसं आमच्याकडे माझं तंतोतंत अन्न बनविणे असते, शिळं अन्न मला मुळीच पटत नाही. जास्ती करतही नाही, उरतही नाही. मात्र शिळ्या पोळ्या उरणं म्हणजे आनंदोत्सव असतोय. कारण एकतर त्याचं उप्जविलास, राजभोग, चुरमा, फोडणीच्या पोळ्या काय काय बनतं. आणि हा जो प्रकार आहे, तो सर्वात उच्ची आहे. साठवून ठेवता येतो, हवं तेव्हा झटपट बनवून खाता येतो, पौष्टीक आहे… अजून काय हवं.
कधी कधी अचानक आपला वेगळाच कार्यक्रम ठरतो आणि तयार स्वयंपाक जैसे थे राहतो. पोळ्या भरपूर उरल्या असतील तर हे नक्की करून ठेवा.
पोळ्या छान कैचीने शंकरपाळ्यासारख्या लहान आकारात कापून घ्या, आमच्याकडे पोळीचे सरळ चार तुकडे करून वाळवतात मी मात्र लहानलहान तुकडे करते. मस्तपैकी उन्हात वाळवून घ्या, कडक झाल्या की गरमागरम तळून सॉस नाहीतर तिखट चटणीबरोबर गट्टम करा. नुसतं या तळलेल्या पोळ्यांवर तिखट मीठ, चाट मसाला आणि हवा तो जिन्नस भुरकावला तरीसुद्धा बल्ले बल्ले काम होतंय.
बरेचदा आपण एकटंच असतो, एकट्यासाठी स्वयंपाक करायचा कंटाळा असतो, अशावेळी अर्ध्या पोळीचीही भूक नसतांना चार पोळ्या तुम्ही सहज गायब करता… हे विशेष.
पिज्जा, बर्गर, मॅगी, पास्ता यांच्या बदल्यात मुलांना देऊन बघा आणि तुम्हीही खाऊन बघा… खास ऑप्शन आहे. मुलांच्या डब्ब्यातही झटपट देण्यासारखा आणि पोटभर.
आमच्याकडे एकदोन पोळ्या उरल्या तरीही त्या पटकन स्वतःला उन्हात वाळवून घेतात आणि लगेहात आमच्या पोटात पडतात.
– नमिताप्रशांत 🌿