परळी आगारात मासिक इंधन बचत उपक्रम

🔶 राज्य परिवहन इंधन बचत उपक्रम

बीड/परळी वैजनाथ- प्रतिनिधी- राज्य परिवहन महामंडळाच्या परळी आगारामध्ये इंधन बचत मासिक कार्यक्रम 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी परळी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री सिध्दार्थ सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यु हायस्कूल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस पी देशमुख, प्रा. अमर देशमुख तसेच पत्रकार बाळकृष्ण सोनी , धनंजय आरबुने हे उपस्थित होते.

उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी रिबीन कापून व श्रीफळ फोडून केले. सदर कार्यक्रमप्रसंगी आगारचे यांत्रिक कर्मचारी श्री गर्जे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी इंधन बचतीसाठी यांत्रिक कर्मचारी करत असलेले प्रयत्न विशद केले. तसेच आगाराचे चालक मुंडे यांनीदेखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य एस. पी. देशमुख यांनी इंधन बचतीचे महत्त्व सोप्या शब्दात रा.प. कर्मचाऱ्यांस समजावून सांगितले. अध्यक्षीय समारोपाच्या भाषणातून आगार प्रमुख सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांना उपलब्ध साधन सामग्री व परिस्थितीत रा. प. परळी आगाराचे कर्मचारी इंधन बचत करून परळी आगाराचे नाव महाराष्ट्रात झळकावतील असे आवाहन करून विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी इतरही मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगाराचे कामगार नेते रमेश गिते यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स.का.अ.श्री गर्कळ व वाहतूक निरीक्षक श्री दराडे यांनी प्रयत्न केले.