मुंडे साहेब हे लोकनेते बिरूदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री शिंदे

नांदूर शिंगोटयात साकारला भव्य- दिव्य गोपीनाथ गड
केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री शिंदे, पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत लोकनेत्याच्या स्मारकाचे थाटात लोकार्पण.

मुंडे साहेब माझे नेते  – नितीन गडकरी
मुंडे साहेब हे लोकनेते बिरूदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री

नाशिक । दिनांक १८।
लोकनेते मुंडे साहेब माझे नेते होते, त्यांच्या नेतृत्वात मी काम केलेलं आहे असं सांगत पंकजाताई आणि प्रितमताई यांच्यावर जनतेचं प्रचंड प्रेम आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा घेऊन त्या काम करत असून त्यांनी उभा केलेला उपेक्षित-वंचितांचा लढा त्या पुढे नेत आहेत, त्यांना येणाऱ्या काळात प्रचंड यश मिळेल असा विश्वास  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मुंडे साहेब यांनी आयुष्यभर सर्व सामान्यांसाठी संघर्ष केला, ते लोकनेते बिरूदाचे खरे मुकुटमणी आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला.तर दहा वर्षे लोटली तरी मुंडे साहेबांचं स्मारक झालं नाही, त्यामुळं आता स्मारक बाधण्यापेक्षा
ऊसतोड मजूरांच्या मुलांसाठी वस्तीगृहं, उपेक्षित- वंचितांसाठी हाॅस्पीटल बांधा अशी विनंती भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकापर्ण सोहळा आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, खा. डाॅ  प्रितमताई मुंडे, खा. हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

पंकजाताई पुढे म्हणाल्या की, लोकनेते मुंडे साहेब यांचं स्मारक हे २०१४ मध्ये बांधलं जाणार होतं. मात्र, आज इतके वर्ष झाली तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. मुख्यमंत्र्यांना  विनंती आहे की, इतकी वर्ष झाले तरीही मुंडे यांचं स्मारक बांधलं गेलं नाही. आता ते स्मारक बांधूही नका. लोकनेते मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा नाशिक, पुणे, बीड, नगर, पुणे, मुंबई या प्रमुख ठिकाणी उसतोड- कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृहे बांधा, छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटल बांधा. त्यामुळे समाजातील उपेक्षित-वंचित घटकांना मोफत उपचार मिळतील.. मंत्री असतांना उसतोड मंडळ माझ्याकडे नव्हतं, त्यामुळं मला ऊसतोड मजुरांसाठी काम करता आलं नाही, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली.आज मुंडे साहेब आपल्यात नाहीत, ही गोष्ट प्रचंड वेदनादायी आहे. म्हणून प्रत्येक गावागावात गोपीनाथ गड उभे केले जातात. नगरमध्ये गोपीनाथ गड उभारण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, मुंडे साहेब आक्रमक होते, असं अनेकांना वाटतं. मात्र, त्यांचा आक्रमकपणा हा सामान्य लोकांच्या हितासाठी होता. आमच्यातलाही आक्रमकपणा हा सर्वसामान्य माणसांठीच असेल असं त्या म्हणाल्या.

*भर पावसातही पंकजाताईंच्या भाषणाने जोश*
———-
कार्यक्रमा दरम्यान, पावसाने हजेरी लावली. यावेळी पंकजाताई मुंडेंनी संघर्षयात्रेतील पावसाची आठवण देत सांगितलं की, या कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबात ज्वाला आहेत. आता पुन्हा पेटून उठायचं, कुणापुढं झुकायचं नाही, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

नितीन गडकरी
——–
भाजप हा खऱ्या अर्थाने महाजन – मुंडेंमुळे उभा राहिला. स्व. गोपीनाथरावांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्यासाठी आयुष्य वेचलं. ते एका जातीचे नव्हते. सर्वांसाठीच त्यांनी आवाज उठवला. आज नाशिकमध्ये त्यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होतंय, ही अभिमानाची बाब आहे.’स्व. गोपीनाथराव यांच्या स्मृतीला मी हात जोडून वंदन करतो. पुतळा जसा महत्त्वाचा आहे तसेच व्यक्तीचा विचारदेखील महत्त्वाचा आहे. त्यांचे विचार माझ्यासह आम्ही सर्व जण पुढे घेऊन जाऊ.

मुख्यमंत्री शिंदे
———
आज ही गोपीनाथ मुंडे  यांच्यावर प्रेम करणारी जनता शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेतात. ती श्रद्धा, प्रेम आहे,  गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते. कोणाला आवडो न आवडो, परखड बोलणारे होते, सत्तर च्या दशकात सायकलवर शबनमची पिशवी घेऊन पायी फिरून भाजप वाढविण्याचे काम केले. भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे होते. त्यांचे वक्तृत्व कर्तृत्व शिकण्यासारखे आहे. ते बोलत असताना सन्नाटा असायचा. माणसं जोडण्याची ताकद मुंडे यांच्याकडून शिकण्यासारखी असल्याचे शिंदे म्हणाले.

यावेळी छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय सांगळे यांनी केले. कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.