◾अरविंद जगताप यांचे व्याख्यान व निमंत्रितांचे कविसंमेलन याची मेजवानी
बीड/परळी-वैजनाथ,प्रतिनिधी – येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात येणारा यावर्षीचा स्मृतिसोहळा दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी आयोजित केलेला आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भन्नाट अशा कार्यक्रमाची मेजवानी या स्मृतीसमारोहाच्या या सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे.
गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी या सोहळ्याचे उद्घाटन सकाळी 11 वा. मा. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.तर दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता परळीकर रसिकश्रोते ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात असे सर्व रसिकश्रोत्यांच्या आवडीचे ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ संपन्न होणार आहे.त्यात प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई ) अरुण पवार (परळी वैजनाथ ) गोपाल मापारी (अकोला) दिवाकर जोशी (परळी वैजनाथ) हे महाराष्ट्रातील मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.हास्याचे फवारे उडवतानाच मनाला मोहविणाऱ्या गेय व आशयसंपन्न अशा कवितांचे आविष्करण यावेळी रसिकश्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे.दिनांक 31 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते , चित्रपट पटकथाकार,गीतकार मा. अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी ‘या विषयावर खुमासदार विनोदी शैलीत जीवन उपयोगी असे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे.वास्तविक डांबिस ,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ,गोष्ट छोटी डोंगराएवढी ,कोण आहे रे तिकडे ,बापरे बाप ,खुर्ची सम्राट ,गुलदस्ता , जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा , तीन बायका फजिती ऐका ,प्यार वाली लव स्टोरी , तुहीरे , पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा ,गड्या आपला गाव बरा ,अडगुला मडगुला अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ मराठीतील चित्रपटाच्या पटकथा व असंख्य मराठी गाणी लिहिणारे अरविंद जगताप यांना या व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकायला मिळणं ही परळीकर रसिकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.
संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. अनिलराव देशमुख ,अध्यक्ष संजयजी देशमुख सचिव रविंद्रजी देशमुख ,कोषाध्यक्ष प्रसादजी देशमुख ,प्राचार्या तथा संचालिका डॉ.विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार या तिन्ही कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन समिती करत आहे.तरी या कार्यक्रमास परळी पंचक्रोशीतील बहुसंख्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.अरुण चव्हाण , प्रा.डॉ. पंढरीनाथ गुट्टे, प्रा.डॉ.संगीता कचरे,प्रा.डॉ.विद्या गुळभिले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले आहे.
