“श्री सिद्धेश्वर मंदिर “…कायगाव टोका, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर.(अहमदनगर )

🔶 ऐतिहासिक🔻 प्राचीन शिल्पकला 🔻मंदिरे 🔻गोदाकाठ🔻 गोदा संगम🔻 भटकंती

“श्री सिद्धेश्वर मंदिर “…कायगाव टोका, ता. नेवासा

अहिल्या नगर -(नमिताप्रशांत)  छ. संभाजीनगर ते अहिल्यानगर जात असतांना मध्येच असणाऱ्या नेवासाला थांबून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी दोन क्षण विसावावं, असा आमचा विचार ठाम होता. परंतू संभाजीनगर स्थित असणाऱ्या माझ्या मोठ्या भावाने मला सुचवलं की, “तुम्हांला प्राचीन वास्तूकला बघण्याची आवड असल्याने जाता जाता तुम्ही, प्रवरा संगम येथे म्हणजे, नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा नदी व नाशिकडून येणारी गोदावरी यांच्या संगमावर सिद्धेश्वर, घटेश्वर, रामेश्वर व मुक्तेश्वर ही अतिशय प्राचीन म्हणजे चालुक्यकालीन सुंदर अशी मंदिरे आहेत. त्यातील रामेश्वर हे मंदिर अलीकडे कायगावजवळ असून ही सर्व मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. येथे जरूर दर्शन घ्यावे.” त्यामुळे प्रचंड उत्सुकता होतीच.

गोदावरी आणि प्रवरेचा संगम आणि तीरावरची तसेंच पाण्यात असणारी काही मंदिरे, आहाहा… अद्भुत दर्शन 🌿🙏

रामेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर ही मंदिरे आकारमानाने सिद्धेश्वर मंदिराच्या तुलनेत लहान असून सर्व मंदिरांना अद्भुत शिल्पसौंदर्यसहित स्वतःची आपली अशी वेगळी कथा देखील आहे. परंतू मला स्वतःला प्रचंड भावलेलं सिद्धेश्वर मंदिर मी तुम्हांला सर्वप्रथम दाखविणार आहे. बाकीचे मंदिरे नंतर.

मूळ सिद्धेश्वराचा गाभारा पूर्वाभिमुख असून मंदिराचे प्रवेशद्वार मात्र पश्चिममुखी आहे आणि चारही बाजूनी तटबंदी असून प्रवेशद्वारावर सुरेख नगारखाना आहे, मंदिराची रचना पुर्ण हेमाडपंथी शैलीची असूनही थोडी पेशवेकालीन झलक त्यांत डोकावते. म्हणजे दालन, झरोके, खांब इत्यादी. आतील प्रांगणात मुख्य शिवमंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे मंदिर असून डाव्या बाजूला देवीचं अशी आणखी दोन मंदिरे आहेत.
हे मंदिर बाहेरून जेवढं कोरीव आहे, तुलनेत आतील सभामंडप अतिशय साधं आहे. बाहेरील कोरीवकाम मंत्रमुग्ध करणारं असून रामायण, महाभारतातील क्षणचित्रे यावर कोरलेली आहेत. भीमाचं गर्वहरण, गोपिकांसमवेत श्रीकृष्णलीला, अर्जुन गर्वहरण, सीता हनुमान भेट इत्यादी असे बरेच प्रसंग अतिशय कोरीव आणि बोलकें आहेत.
मंदिराच्या समोरील बाजूस श्री विष्णूचे मत्स्यावतार, कूर्मावतार, वराह अवतार, नृसिंहावतार, वामन अवतार, परशुराम अवतार, रामावतार, कृष्णावतार, बुद्धावतार, कल्कीअवतार असे दशावतार कोरलेले आहेत.

बघतांना असं वाटतं, की मुख्य यजमानाने सुचवलं असावं… ज्याला जे प्रसंग जिथे कोरावेसे वाटतातंय त्यानें तिथे ते कोरावेत.

विष्णुचे आणि देवीचे मंदिर, मुख्य शिवमंदिराच्या तुलनेत लहान आहेत. देवीचे मंदिर चांदणीच्या आकाराचे असून ही संपूर्ण चांदणी मात्र छायाचित्रात टिपता येत नाही, त्याकरिता ड्रोन कॅमेरा हवा.
येथे आम्ही बरीच छायाचित्र काढलीत, तरीही ती सर्वच येथे टाकणे जमणार नाहीत. तसं पाहिलं तर…छायाचित्रांपेक्षा प्रत्यक्ष तेथे जाऊनच हे शिल्पसौंदर्य अनुभवणे उचित ठरेल. एकदा जरूर जरूर जमेल तसं, जमेल तेव्हा दर्शन घ्यावे.