🔷 गुन्हा केल्यास बेट मकोका सारख्या कारवाईचा इशारा
बीड – जिल्ह्यातील राजकीय, सामाजिकसह इतर गुन्हे करणाऱ्या लोकांचा इतिहास बीड पोलिसांनी काढला. त्यांना शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत त्यांची परेड घेण्यात आली. शांतता ठेवा. कायदा व सुव्यवस्था बिघाडणार नाही, याची काळजी घ्या. जर कोणी गुन्हा केला, तर त्यांच्यावर हद्दपार, एमपीडीएसह वेळ पडली, तर मकोकासारखी कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गुन्हेगारांची परेड नगरिकाणी अनुभवली. या परेड मध्ये वाळू माफियांसह गुंड चमकी राजकारणी होते. या सर्वांना जाहीरपणे शांततेचे आवाहन केले. जर यापुढे शांततेचा भंग, गुंडगिरी केली, तर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.
गेली काही वर्षे रेकॉर्डवर असलेल्या आणि जिल्ह्यात दहशत, राख माफिया, पिस्तुलबाजी, गौण खनिज, वाळू माफिया, यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले होते. त्या सर्वांना शांततेच्या सूचना दिल्या होत्या, तसेच काही लोकांवर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या होत्या. त्यानंतर आता गुंडा रजिस्टरची पाहणी करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शुक्रवारी बोलावण्यात आले होते. दिवसभर त्यांना अधीक्षक कार्यालयात बसविल्यावर दुपारी त्यांची परेड घेण्यात आली.
नवीन ऑनलाइन सीसीटीएएनएसवर सर्व गुन्हेगारांची सविस्तर माहिती एका क्लीकवर मिळत आहे.याचाच आधार घेऊन या गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. मागील १० वर्षांत त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती काढून त्यांना शांततेचे आवाहन करण्यासह कारवाईचा इशाराही दिला.
या परेड मध्ये विविध पक्षातील राजकीय नेत्यांचा समावेश दिसून आला. पोलिसांनी परेड घेतलेल्या लोकांमध्ये अनेक राजकीय छोटे-मोठे नेतेही सामील होते, तसेच काही सामाजिक कार्यकर्तेही दिसून आले. काही वृद्ध, अनेकांच्या गळ्यात सोन्याच्या चेन आणि व्हीआयपी वाहनांतून आलेले दिसून आले. यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांना सूचना केल्या. तसेच, यापुढे गुन्हा केल्यास कारवाईचा इशाराही दिला. याच दरम्यान, काही लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली.

