आ.सुरेश धस यांचा परळीत काळे झेंडे दाखवून निषेध

🔶 सुरेश धस चले जाओच्या घोषणा 🔶सिरसाळा,आणि परळीत काळे झेंडे, घोषणा बाजी

बीड/परळी-वैजनाथ : शहरातील महादेव मुंडे यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट घेऊन सुरेश धस शहरातील जलालपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या अडीअडचणी, ऐकण्यासाठी आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विषयी चुकीचे आरोप करत व परळीला बदनाम करीत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चले जाव, सुरेश धस चले जाव अशा घोषणा देत आ धस यांचा निषेध नोंदविला. दरम्यान असाच प्रकार सिरसाळा येथे देखील घडला असून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धस यांचा निषेध केला. दरम्यान, काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी परळी शहरात पाच तर सिरसाळा येथे तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

परळी शहर किंबहुना तालुक्यातील हजारो गरीब, मध्यमवर्गीय ठेवीदारांचे कष्टाचे कोट्यावधी रुपये राजस्थानी मल्टीस्टेट , राजस्थानी पतसंस्था, ज्ञानराधा मल्टीस्टेट व तसेच मल्टीस्टेटच्या ठेवीदाराचे करोडो रुपये अडकले आहेत. या प्रश्नी ठेवीदार कृती समिती ची बैठक शहरातील जलालपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आ. सुरेश धस आले होते. तेव्हा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ.धनंजय मुंडे, वाल्मिक कराड समर्थक कार्यकर्त्यांनी आ. सुरेश धस यांच्या गाडी समोर विरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान यावेळी पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आमदार सुरेश धस यांनी जातिवाद निर्माण केला आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या बाबतीत आरोप करीत परळी शहराची बदनामी केली आहे. त्यामुळे आमदार धस यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला,  अस निषेध करणाऱ्या समर्थकांनी सांगितलं.