श्री नागनाथ पारसेवार यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त महिलांचा सन्मान

बीड-परळी वैजनाथ ( एम एन सी न्यूज नेटवर्क) योग गुरु श्री नागनाथ पारसेवार यांचा जिजामाता गार्डन क्लब व स्व. वंदना नागनाथ पारसेवार सामाजिक प्रतिष्ठान च्यावतीने सकाळी ८: ३० वा. त्यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाज कार्यात अग्रेसर असलेल्या निवडक महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यामध्ये पतंजली योग समिती तालुका प्रभारी सौ सरलाताई उपाध्याय, समाजसेविका सौ विजया दहिवाळ,आदर्श शिक्षिका सुनीता कुमावार, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अर्चना रुद्रवार, मा.नगर सेविका उमाताई समशेट्टी यांचा फेटा, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा यांनी जिजामाता गार्डन क्लब च्या वतीने शुभेच्छा देताना असे म्हणाले की योग गूरूचे मन असलेले मनासारखे योगगूरू आपणास लाभले हे आपले भाग्य. प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत, आणि असेच श्रीमंत असणारे आपले योग गुरू नागनाथराव पारसेवार नियमितपणे गार्डन मध्ये उपस्थित राहून आपणास शास्त्रीय पध्दतीने योगासने व प्राणायाम शिकवितात व आपल्याकडून करवून घेतात याबध्दल क्लबचे सर्व सदस्य आपले आभारी आहोत. मिञांनो,असं कोणतच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल.पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल.असे समाधान असणारे नागनाथराव पारसेवार गार्डन क्लब मध्ये आपले योगदान व मार्गदर्शन देऊन योगासन व प्राणायाम चालू असतांना बोलू नका असे नम्रपणे आम्हास टोकत असतात. हे आपल्या सर्वांच्या हिताचे असून आपण त्यांच्या सूचना गंभीरपणे पाळण्याचा प्रयत्न करुन त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता गार्डन क्लबचे अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक नेते जुगलकिशोर लोहिया, सामाजिक नेते प्रभाकर पैंजणे, स्व.वंदना नागनाथ पारसेवार सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश कौलवार, वेलनेस कोच तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर,दै.मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे अप्पा,पुण्य नगरी चे पत्रकार धनंजय आरबुने उपस्थित होते.

या नंतर जिजामाता उद्यान चे महिला सफाई कामगारांना घरातील उपयोगात आणता येईल असे भेट वस्तू देऊन त्यांचा सुध्दा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विठ्ठल साळुंखे गुरुजी यांनी केले. कार्यक्रमास बंडू सेट गरुड, ओमप्रकाश भुतडा, व्ही.व्ही.ताटीपामल, लोढा सर, काकानी सर, शिंदे सरा सह जिजामाता गार्डन क्लब व स्वर्गीय वंदना नागनाथ पारसेवार सामाजिक प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व सभासद महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिजामाता गार्डन क्लबचे सचिव चंद्रकांत मुंडे यांनी दिली.