
🔷 परळी औष्णिक विद्युत केंद्रात महिला दिन उत्साहात
बीड/परळी-वैजनाथ: एम एन सी न्यूज नेटवर्क- वीज निर्मितीत महिलांचा सक्षम सहभाग असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांनी केले.ते परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.शक्तीकुंज येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस सुरुवातीला बंधन पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, चार्टर्ड अकाउंटंट संकेत मंत्री, अनिता इंगळे, अनिता महाजन आणि मनीषा अवचार उपस्थित होते. विचारपीठावर उपमुख्य अभियंता महेश महाजन, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड आणि सुरक्षा अधिकारी बी. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्य अभियंता सुनिल इंगळे म्हणाले की, “आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीमध्येही महिलांचा मोलाचा वाटा आहे. येथील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी महिलांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.
पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी महिलांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. महिलांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि नेहमी सतर्क राहावे, असेही ते म्हणाले. चार्टर्ड अकाउंटंट संकेत मंत्री यांनी महिलांचे नियोजन कौशल्य उत्कृष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी महिलांना भविष्याची गरज लक्षात घेऊन बचत करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमात अभियंता हिमानी होटकर आणि आरपी विभागातील सर्वोत्कृष्ट कर्मचारी स्वाती लहाने यांचा मुख्य अभियंत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बीएम विभागातील स्वच्छता कर्मचारी हाजू खाला यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती रांदड यांनी केले, सूत्रसंचालन के. एच. गित्ते यांनी केले आणि आभार माधुरी घुगे यांनी मानले.

