
विशेष लेख क्र.१२
केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना २०२५-२६ मध्ये घेण्यात येणार आहे. या गणनेमध्ये आर्थिक कार्यात गुंतलेल्या सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास / उद्योगास भेट देवून करण्यात येणार आहे. राज्याच्या भौगोलिक सिमांतर्गत ठराविक जागेत अथवा ठराविक जागा नसलेले फिरते व्यवसाय चालविणारे सर्व घरगुती उपक्रम तसेच सार्वजनिक व खाजगी आस्थापनांची माहिती प्राप्त करून घेणे हा आर्थिक गणनेचा प्रमुख उद्देश आहे. आर्थिक गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय उत्पन्न व राज्य स्तरावरून राज्य उत्पन्न या संदर्भातील अंदाज तसेच राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही अधिक अचूकपणे तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. तसेच, ही माहिती जिल्हा व राज्य स्तरावर सामाजिक व आर्थिक व्यवस्थापन तसेच नियोजन यांसाठी उपयोगी होणार आहे. आठव्या आर्थिक गणनेसाठी उप संचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
शासन निर्णय, नियोजन विभाग,क्र.असांस/प्र.क्र.१५५/का.१४१७ या शासन निर्णयास अनुसरून ठाणे जिल्ह्यात सन २०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या आठव्या आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व त्या कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे.
या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवू या.. जिल्हास्तरीय समन्वय समितीबद्दल व या समितीच्या कार्यकक्षेविषयी..
जिल्हास्तरीय समन्वय समिती:-
- जिल्हाधिकारी, ठाणे – अध्यक्ष, 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे – सह अध्यक्ष. 3. पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ठाणे – सदस्य. 4. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, ठाणे – सदस्य. 5. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, ठाणे – सदस्य. 6. जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन, ठाणे – सदस्य. 7. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रिय कार्य विभाग) जिल्हा प्रतिनिधी – सदस्य. 8. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे – सदस्य. 9. जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे – सदस्य. 10. राष्ट्रीय विज्ञान व सूचना अधिकारी, ठाणे – सदस्य. 11. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे – सदस्य. 12. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, ठाणे – सदस्य. 13. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे – सदस्य. 14.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे – सदस्य. 15. सहायक आयुक्त (कामगार), ठाणे – सदस्य. 16. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, ठाणे -सदस्य. 17. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, ठाणे – सदस्य. 18. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे / जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे – सदस्य. 19. मुख्याधिकारी, नगरपरिषद / पंचायत समिती बदलापूर/अंबरनाथ/कल्याण/मुरबाड/शहापूर- सदस्य. 20. आवश्यकतेनुसार इतर विभागाचे मनपा/जिल्हास्तरीय अधिकारी – सदस्य. 21. उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे तथा जिल्हा नोडल अधिकारी, ठाणे – सदस्य सचिव.
जिल्हास्तरीय समन्वय समितीची कार्यकक्षा
१) नियोजन व पूर्वतयारी:-
- आर्थिक गणनेची उद्दिष्टे, व्याप्ती आणि कार्यपद्धती यांचा आढावा घेणे.
- गणनेच्या क्षेत्रकामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणेसाठी आराखडा तयार करणे.
- प्रगणक, पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या निश्चित करणे.
- गणनेचे सर्व भागधारक जिल्हा, तालुका, नागरी/ ग्रामीण पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यापर्यंत माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार सुनिश्चित करणे.
- प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी क्षेत्रकामाची कालमर्यादा आणि अंमलबजावणी धोरण निश्चित करणे.
- याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे.
२) विविध स्तरावरील प्रशिक्षणे व क्षमता बांधणी:-
- नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांचे विहित मानकाप्रमाणे प्रशिक्षणे पूर्ण करण्यासाठी कालबध्द आराखडा तयार करणे.
- जिल्हा, तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणे.
- क्षेत्रकामासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित प्रगणक व पर्यवेक्षक उपलब्धतेबाबत निश्चिती करणे.
- याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे.
३) समन्वय:-
- आर्थिक गणना दरम्यान सहकार्य करण्यासाठी विविध जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय राखणे व आवश्यकतेप्रमाणे निर्देश देणे.
- क्षेत्रीय कर्मचारी यांना जिल्ह्यातील सर्व कुटुंबे, खाजगी व सार्वजनिक आस्थापना यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळणेसाठी नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देणे.
४) क्षेत्रकामाचे सनियंत्रण:-
- आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम गुणवत्तापूर्ण व विहित कालावधीत पूर्ण होण्याच्यादृष्टीने किमान दर पंधरवड्यात आढावा बैठक आयोजित करुन सनियंत्रण करणे.
- क्षेत्रकामात येत असलेल्या अडचणींचा आढावा घेवून त्यावर उपयायोजना करणे याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे.
- आर्थिक गणनेच्या प्रगतीचे अहवाल प्रादेशिकस्तर व राज्यस्तरावर सादर करणे.
५) आठव्या आर्थिक गणनेची जनजागृती व प्रसिध्दी:-
- आर्थिक गणनेची संकल्पना, व्याप्ती, क्षेत्रकाम व त्यामधील भागिदारांचा सकारात्मक सहभाग निश्चित करण्यासाठी प्रसिध्दी आराखडा तयार करणे.
- प्रसिध्दी आराखड्याच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करणे व आवश्यकतेप्रमाणे संबंधितांना निर्देश देणे.
- गणनेमध्ये बिगर शासकीय संख्या जसे की व्यावसायिक संघटना, उद्योग असोसिएशन्स, चेंबर ऑफ कॉमर्स, जिल्ह्यातील महत्वाचे उद्योग समूह यांचा सहभाग निश्चित करणे याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे.
६) माहितीचे प्राथमिक वैधतीकरण:-
- आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामादरम्यान गोळा केलेल्या माहितीचे प्राथमिक स्तरावर वैधतीकरण करण्यासाठी उपाययोजना करणे.
- वैधतीकरणासाठी उपलब्ध वैकल्पिक माहितीस्त्रोतांचा (जसे की विविध कायद्यांतर्गत नोंदणी प्राधिकरणांकडे उपलब्ध माहिती) शोध घेवून त्याआधारे गोळा केलेली माहितीचे प्राथमिक वैधतीकरण करणे.
७) राज्यस्तरीय/प्रादेशिकस्तरीय समन्वय समितीने निर्देशित केल्याप्रमाणे वैधतीकरणाअंती गणनेची जिल्हास्तरीय माहिती राज्यस्तरावर सादर करणे.
८) क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देय मानधन/पारिश्रमिक वाटपाचा आढावा घेणे व त्याचे सनियंत्रण करणे.
९) राज्यस्तरीय, विभागस्तरीय समन्वय समिती व आर्थिक गणना कक्षांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करणे.
१०) आर्थिक गणना सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्यासाठी निर्देश देणे.
◾मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.

