परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

परळी, (प्रतिनिधी):- परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पांगरी येथे मोटरसायकल चोरी, बेलंब्यात घरफोडी, वडखेल व तडोळी येथे शेतातील इलेक्ट्रिकल मोटार, कापसाच्या गोण्या, हरभऱ्याचे कट्टे तसेच टोकवाडी येथे शाळा फोडण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी ही मागणी नागरिकांतून केली जात आहे.

याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, दि. 21 मार्च 2023 रोजी रात्रीच्या दरम्यान वसंत व्यंकटराव तिडके रा. पांगरी यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. मित्राच्या घरासमोर लावलेली होंडा कंपनी ड्रीम युगा, काळ्या रंगाची, सन 2016 मधील मोटार सायकल ज्याची किंमत 50 हजार रुपये असून ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 78/2023 कलम 379 भादवी प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रामचंद्र केकान हे करीत आहेत. तर परळी तालुक्यातील बेलंबा येथे जयसिंग वसंत गीते यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी घराच्या गेटला लावलेले लॉक तोडुन प्रवेश करत दुस-या मजल्यावरील रूम मध्ये जाउन लोखंडी कपाट तोडुन त्यातील एक नेलेस (एक तोळा), एक गंठन (एक तोळा), पाच पाच ग्रॅमच्या दोन अंगठया जुने वापरते असे अंदाजे 40000/-रू तोळा प्रमाणे एकूण 120000/- रू व पन्नास हजार रूपये रोख असे एकूण 170000 /- रु चा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जयसिंग वसंत गित्ते रा. बेलंबा यांच्या फिर्यादीवरून गुरनं 77/2023 कलम 457,380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गित्ते हे करीत आहेत.

टोकवाडीच्या शाळेत चोरीचा प्रयत्न
परळी तालुक्यातील मोजे टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयात अज्ञात चोरट्यांनीदिनांक 23 मार्च 2023 रोजी रात्री आठच्या सुमारास शाळेतील संगणक चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान अचानक कामानिमित्त शाळेतील कर्मचारी आले असता सदरील चोरटे पसार झाले.
याप्रकरणी रत्नेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. टी. मुंडे यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

——————————————-

सोयाबीनचे कट्टे लंपास

परळी तालुक्यातील मौजे वडखेल येथील बाळासाहेब आगलावे यांच्या शेतातील सोयाबीनचे भरून ठेवलेले कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक 21 मार्च 2023 रोजी घडली आहे. व्यंकटराव आगलावे यांच्या शेतातील गोण्यात भरुन ठेवलेला कापूस चोरट्याने लंपास केला असून गोविंद आगलावे यांची इलेक्ट्रिक मोटार पळविली आहे. याप्रकरणी बाळासाहेब आगलावे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच परळी तालुक्यातील तडोळी येथील एकाचा एक क्विंटल कापूस चोरुन नेला तर एका शेतकऱ्याचा हरभऱ्याचा एक कट्टा चोरून नेल्याची घटना घडली आहे.

—————————————–

नागरिकांनी सतर्कता बाळगावी
वडखेल, टोकवाडी, पांगरी, बेलंबा आदी परिसरात
झालेल्या चोरींच्या घटनाबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी घाबरून जावु नये. सतर्कता बाळगावी.

पो.नि.सुरेश चाटे
परळी ग्रामीण