🔶श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने.
बीड/परळी वैजनाथ, एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी वैजनाथ जवळील डोंगरतुकाई हे जाज्वल्य ठिकाण आहे.या मंदिरात गुहेत साधारणत: चार ते पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खाली तळघर लागते. तळघर साधारणत: पाच फूट लांबी रुंदीचे आहे. याच गुहेत श्री.दत्तात्रय अवतार प.पू.श्री. श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर) हे याच गुहेत एक वर्ष वास्तव्यास राहिले होते. या अनुषंगानेच श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील बारा ज्योतिर्लंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणुन मान्यता असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पवित्र पावन अशा परळी वैजनाथ या क्षेत्री श्रीमद् नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे काही काळ वास्तव्य झाले, अशा पवित्र नगरीमध्ये श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा सोमवार दि.०७-०४- २०२५ ते गुरुवार दि.१०-०४-२०२५ आयोजित करण्यात आला आहे. ९० वर्षापूर्वी संत कवी परमपूज्य दासगणू महाराजांनी श्री गुरुचरित्र या सिद्धग्रंथावर आधारित “श्री गुरुचरित्र सारामृत” हा सिद्धग्रंथ लिहला आहे. सांप्रत काळाचा विचार करून या धकाधकीच्या काळात श्रीगुरुचरित्राची नितांत गरज असल्याकारणाने सर्व कडक नियमांना शिथिलता देऊन सर्व समाजातील स्त्री- पुरुषांना वाचता येण्याकरता या ग्रंथाची निर्मिती करून घेतली.
गुरुतत्त्व प्रदीप या संस्थेने घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावे या उदात्त हेतूने मागील एक वर्षाच्या कालखंडात १०८ व १००८ पारायणांचे सामुदायिक कार्यक्रम घेतलेले आहेत.या अनुषंगानेच परळी शहरात श्री वैजनाथ ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्यात शहर व परिसरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने पारायणास बसावे. या कार्यक्रमात पारायण सेवा निशूल्क असुन पारायणास बसणाऱ्या वाचकांस पारायण समाप्तीनंतर आयोजकां तर्फे ग्रंथ प्रसाद रुपात देण्यात येईल. या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री वैजनाथ ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
🔶 कार्यक्रमाची रुपरेषा
दर्शन मंडप, वैद्यनाथ मंदिर, श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे सोमवार दि.०७-०४-२०२५ ते गुरुवार दि.१०-०४-२०२५ होणाऱ्या या सोहळ्यात दैनंदिन सकाळी ८ ते ९ वा. : रुद्र अभिषेक, सकाळी ९ ते १२ वा. : श्री गुरुचरित्र सारामृत पारायण,दु. १२ ते २ वा. : भिक्षा, नैवेद्य, आरती व प्रसाद, दु.४:३० ते सायं. ७:३० वा. : श्री गुरुचरित्र कथामृत अशी रुपरेषा आहे.प.पू. मकरंद महाराज (पिठाधिपती, श्री क्षेत्र दत्तधाम (कारेगाव), परभणी) हे कथामृत विवेचन करणार आहेत.

