🔶 परळीत विशेष साप्ताहिक बैठकीचे आयोजन
बीड-परळी वैजनाथ-एम एन सी न्यूजनेटवर्क– छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या साम्राज्याला शिवशाही म्हणुन ओळखले जाते.या शिवशाहीचा प्रेरणादायी इतिहास आणि वर्तमान समजून घेण्यासाठी गुरुवार दि.१० एप्रिल रोजी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने विशेष साप्ताहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि.१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.धनंजय ढोणे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे,प्रमुख अतिथी म्हणून औ.वि.केंद्राचे कल्याण अधिकारी शरद राठोड हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी फुले,शाहु आंबेडकर अभ्यास समुहाचे अभ्यासक चेतन निसर्गंध हे उद्बोधन करणार आहेत.यावेळी दै.पुण्यणगरीचे ता.प्रतिनिधी धनंजय आरबुने,मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे,दै.सकाळचे प्रा.प्रविण फुटके,दै.गावकरीचे जगदिश शिंदे,दिव्य मराठीचे धनंजय आढाव, वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, महाराष्ट्र प्रतिमाचे संपादन ज्ञानोबा सुरवसे, परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे,दै.नवराष्ट्रचे महादेव शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात १६४६ ते १७१३ या कालखंडात या शिवरायांनी घडवलेल्या प्रेरणादायी इतिहास,त्यांच्या पश्चातील पेशव्यांचे नियंत्रण आणि १ जानेवारी १८१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाई नंतर पुन्हा छत्रपतींकडे आलेली शिवशाहीची गादी,याच प्रेरणेतून बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांसारख्या संस्थानिकांनी लोककल्याणकारी राज्यकारभार.या महत्त्वपूर्ण राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर, १० एप्रिल १८१८ रोजी छत्रपती प्रतापसिंह महाराजांची पुन्हा साताऱ्याच्या गादीवर झालेली स्थापना याविषयांना उजाळा देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष भगवान साकसमुद्रे,रानबा गायकवाड,बा.सो.कांबळे,नितीन ढाकणे आदींनी केले आहे.

