कै.विजयसिंह राजे महाडिक यांच्याबद्दल..
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक श्री. विजयसिंह महाडिक साहेब यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी अपघाती निधन झाले.
श्री.महाडिक हे त्यांच्या घराच्या छतावर सकाळी ११ वाजता गेले होते. उन्हाच्या तीव्रतेने चक्कर आल्याने तोल जाऊन ते खाली पडले. यात त्यांना गंभीर इजा झाली. हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
विजयसिंह महाडिक हे गेली तीन दशके सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत होते. मराठा आरक्षणासाठी ते १९९६ पासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चळवळ उभी केली होती. मनोहर जोशी, नारायण राणे यांच्या पासून ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण मिळावे यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. २००५ साली सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. २००६ सालापासून मराठा आरक्षण चळवळ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र केली. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना घेऊन पानिपत येथे शौर्य दिन साजरा करून मराठ्यांची ताकद वाढवली.
२००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करत त्यांनी मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या २७ मागण्या घेऊन सरकारवर दबाव आणून त्या मागण्या मान्य करून घ्यायला त्यांनी भाग पाडले. २००८ पासून मराठा मंत्री व आमदार यांना भेटून त्यांनी समाजाला आरक्षणाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट तर केलेच. आणि मराठा आरक्षणसाठी स्थापन झालेल्या प्रत्येक आयोगाला व समितीला त्यांनी माहिती देऊन समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात यशस्वी मध्यस्थी केली. अनेक आयोगासमोर मागण्या तीव्रतेने मांडल्या. मराठा म्हणून स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी ते शेवटपर्यंत आग्रही होते.
२०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावी कराड येथे ९ दिवस आमरण उपोषण करून २०१६ साली मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रातील ४२ संघटना एकत्रित करून त्यांनी मराठा आरक्षण समन्वय समिती स्थापन केली होती. भारतात विखुरलेल्या महाडिक भावकीला एकत्रित करून सरदार हरजीराजे महाडिक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यास सुरवात केली.
मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोर्चे, आंदोलने, पदयात्रा, गोलमेज परिषदा घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम सुरू ठेवले.
🔶 कै.विजयसिंह महाडिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

