भारतीय रेल्वेने विक्रमी वेळेत पूर्ण केला बोगदा

🔷 भारतीय रेल्वे पायाभूत सुविधा 🔷१४.५८ किमी लांबी

नवी दिल्ली (पीटीआय वृत्तसंस्था) – भारतीय रेल्वे आपल्या रेल्वे विस्तारित कामासाठी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. देशभरात अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रकल्प सध्या रेल्वे हाताळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा १२५ किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार केला जात असून या मार्गातील एक बोगदा अत्यंत वेगाने खोदून पूर्ण करण्यात रेल विभागास यश आले आहे. बोगद्याच्या १४.५८ किमी लांबीपैकी १०.४७ किमी बोगदा जर्मनीतील विशेष यंत्राचा वापर करून खोदण्यात आला आहे, तर राहिलेला भाग हा सुरुंगाचा वापर करून खोदण्यात आला आहे. बोगद्याचा व्यास ९.१ मीटरचा आहे. बोगदा खोदण्यातील हा वेग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असल्याचे रेल महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप गौर यांनी सांगितले.

रेल्वे मार्गातील देवप्रयाग ते जानसू टप्प्यात १४.५८ किलोमीटर लांबीचा बोगदा सिंगल शिल्ड टनेल बोअरिंग मशीनचा (टीबीएम) वापर करून खोदण्यात आला आहे. महिन्याला ४१३ मीटर या वेगाने हा बोगदा खोदण्यात आला. यापूर्वी फक्त स्पेनमधील कॅब्रेरा बोगदा महिन्याला ४२३ मीटर या वेगाने खोदण्यात आला आहे, अशी माहिती गौर यांनी दिली.
देवप्रयाग – जानसू बोगदा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत वेगाने खोदलेला रेल्वेबोगदा ठरला आहे. तसेच, या बोगद्याचा वापर सुरू झाल्यावर तो वाहतूकीसाठीचा देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा होईल. या बोगद्याचा व्यास ९.१ मीटरचा आहे. हिमालयातील हे खोदकाम अत्यंत आव्हानात्मक होते, असे गौर यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.

🔷 बोगद्याची खास वैशिष्ट्ये:- विविध बोगद्यातून जाणारा ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा १२५ किलोमीटरच्या मार्गातील १०५ किलोमीटरचा मार्ग आहे.  पुढील मार्गावर  वीस किलोमीटरपैकी ३ किमी लांबीचे पूल असून चार किलोमीटरचा भाग हा भुयारी आहे. त्यामुळे केवळ १२ ते १३ किलोमीटरचा मार्गच सर्वसाधारण आहे. केवळ सुमारे ३ वर्षे १० महिन्यात रेल विभागाने हे काम पूर्णत्वास नेले.