डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी कर्मचारी महिलेस अटक

🔷 डॉ. वळसंगकर आत्महत्या◾आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासन अधिकारी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (रा. सोलापूर) या महिलेस शनिवारी रात्री अटक करून रविवारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी डॉ. आश्विन शिरीष वळसंगकर (४५, रा. वळसंगकर हॉस्पिटल, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार संशयित आरोपी मनीषा हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०८ अन्वये शनिवारी रात्री १० वाजता गुन्हा दाखल केला.

दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये महिलेने खोटे आरोप करून धमकीवजा पत्र पाठवल्याने डॉ. वळसंगकर यांनी त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममध्येच अॅटॅच बाथरूममध्ये पिस्तूलमधून कानशिलामध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे नमूद करून महिला आरोपीला अटकेसाठी मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट परवानगी घेण्यात आली.