◾सामाजिक भान
🔶हुंडा न देण्याची आणि न घेण्याची दिली जाणार शपथ; चार हजार पाहुण्यांची असणार उपस्थिती
🔶 संपूर्ण कार्यक्रम असणार पर्यावरणपूरक; प्लास्टिक साहित्यावर बंदी
बीड/ परळी वैजनाथ-एम एन सी न्यूजनेटवर्क-
ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने ११ गरीब कुटुंबातील जोडप्यांचा आगळा वेगळा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या हलगे गार्डन येथे आज दिनांक १० मे रोजी दुपारी १२.३० वाजता या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, जवळपास ४ हजार पाहुणेमंडळी या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. तसेच हा कार्यक्रम संपूर्णतः पर्यावरणपूरक असणार असून कुठेही प्लॅस्टिकचा वापर केला जाणार नाही अशी माहिती ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांनी दिली. यासंदर्भात जिव्हिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र वगे यांची उपस्थिती होती.
ग्लोबल विकास ट्रस्टचे संचालक मयंक गांधी यांच्या वतीने परळी तालुक्यात मोठी सामाजिक चळवळ उभी करण्यात आली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याच ट्रस्टच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रदीप खेरुका यांचे कुटुंब, त्यांच्या कन्या अलकनंदा रूईया आणि जावई यांच्या वतीने ११ गरीब जोडप्यांच्या विवाहासाठी १५ लक्ष रुपयांची मदत देण्यात आली आहे. लंडन येथे झालेल्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ही देणगी संबंधित कुटुंबाने दिली आहे. आजमितीस अनेक अशी कुटुंबे आहेत ज्यांना की मुलींच्या लग्नाचा भर झेपत नाही. यातूनच अनेकांच्या आत्महत्या होतांना ग्लोबल विकास ट्रस्टने अनुभवलेले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या विवाह सोहळ्यात हुंडा न देण्याची आणि न घेण्याची शपथ दिली जाणार आहे.
ग्लोबल विकास ट्रस्टकडून नवदाम्पत्याला सर्व संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून दिले जाणार असून, प्रत्येक जोडप्याच्या नावे संयुक्तरीत्या ७० हजार रुपयांच्या मुदत ठेव (fix deposit) प्रमाणपत्र त्यांना दिले जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्यास सुमारे चार हजार पाहुणेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

