एम एन सी न्यूज नेटवर्क– नागपूर-अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आग लागली. बस कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना अचानक गाडीतून धूर येत गाडीने पेट घेतला. मात्र, चालकांच्या प्रसंगावधानाने गाडीतील प्रवासी बचावले. चालकाने ब्रेक लावत गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
नागपूर ते अमरावती जाणारी शिवशाही बस (एमएच – 06, बीडब्लू- 0788) सकाळीच नागपूरहून निघाली होती. गाडी कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बस लगेच रस्त्याच्या कडेला लावली, यावेळी वाहक उज्वल देशपांडे यांनी गाडीतील प्रवाशांना खाली उतरवले. यावेळी गाडीत असलेले 16 ही प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केल्याने यात जळून संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पर्यंत बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढे पाठविण्यात आले.
