पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान आत्मघातकी हल्ला करण्याच्या धमकी

कोची / केरळ-एम एन सी न्यूज नेटवर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या धमकी पत्राने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धमकी देणाऱ्या एन के जॉनी याची पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. मल्याळम भाषेत लिहिलेले हे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात आले होते. दरम्यान, जॉनी याने हे पत्र लिहिल्याचे नाकारले आहे. कुणीतरी मुद्दामून त्याच्यानावाने हे पत्र लिहिल्याचा त्याचा आरोप आहे. दरम्यान, या घटनेनंतर केरळमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यासाठी मोदी २४ एप्रिल रोजी कोची येथे आणि दुसऱ्या दिवशी तिरुअनंतपुरम येथे येणार आहेत. केरळमध्ये सध्या वाहनांची तपासणी केली जात आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरही तपासणी वाढली आहे. मात्र, मोदी यांचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

या पत्रामध्ये राजीव गांधीप्रमाणे मोदींना मारले जाईल अशाप्रकराच्या अनेक गंभीर धमक्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी याबाबत राज्यातील पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंबंधी सुरक्षेशी संबंधित व्हीव्हीआयपी प्लान लीक केल्याचा त्यांचा आरोप आहे. ते म्हणाले, केरळमध्ये धार्मिक अतिरेकी संघटना खूप मजबूत आणि सक्रिय आहेत. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा अहवाल माध्यमांसमोर आला आहे. त्यात प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, आणि माओवाद्यांसह अनेक संघटनांचा संदर्भ आहे. पण राज्य सरकार या संघटनांना संरक्षण देत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.