नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
सिल्वासा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96 प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी पंतप्रधानांनी सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. त्यांनी संस्थेचे उद्घाटन करून भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंतप्रधानांनी महाविद्यालयाच्या परिसराच्या प्रारूपाची पाहणी केली आणि अॅकॅडमिक ब्लॉकमधील शरीर रचना संग्रहालय आणि विच्छेदन कक्षाची देखील पाहणी केली. पंतप्रधानांनी मध्यवर्ती वाचनालयात फेरफटका मारला आणि अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी अॅम्फीथिएटरची पाहणी केली आणि तेथील बांधकाम मजुरांशी त्यांनी संवाद साधला.
दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाची यशोगाथा पाहून आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सिल्वासा मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक वास्तव्य करत असल्यामुळे येथील वातावरण विश्वबंधुत्वाचे उदात्त उदाहरण आहे, असे ते म्हणाले. येथील लोकांना परंपरा आणि आधुनिकतेविषयी असलेले समान प्रेम पाहून सरकार या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासाकरता संपूर्ण समर्पित भावनेने कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षांत या केंद्रशासित प्रदेशात 5500 कोटी रुपयांच्या खर्चासह अनेक भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर बरेच काम केले गेले आहे, असे त्यांनी सांगितले. एलईडी दिवे असलेले रस्ते, घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत त्यांनी सांगितले. केंद्रशासित प्रदेशात उद्योग आणि रोजगार वाढवण्याचे साधन म्हणून त्यांनी राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणाची प्रशंसा केली. “आज मला 5000 कोटींचे नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली,” असे ते म्हणाले. हे प्रकल्प आरोग्य, गृहनिर्माण, पर्यटन, शिक्षण आणि शहरी विकासाशी संबंधित आहेत. “ते राहणीमान, पर्यटन, वाहतूक आणि व्यवसायात सुधारणा करतील,” असे ते पुढे म्हणाले.
आज लोकार्पण केलेल्या कित्येक प्रकल्पांची पायाभरणी स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती, याचा उल्लेख करून त्यांनी आनंद व्यक्त केला. यापूर्वी देशाच्या विकासाचे अनेक सरकारी प्रकल्प एकतर बराच काळ रखडले, कधी अर्धवट सोडण्यात आले किंवा भरकटले गेले, तर कधी कधी त्यांची पायाभरणीच मोडकळीस येत असे अशा तऱ्हेने बरेच प्रकल्प अपूर्ण राहत असत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र गेल्या 9 वर्षात, देशात नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आली असून नवीन कार्य संस्कृतीचा उदय झाला आहे, यावर त्यांनी भर दिला. विद्यमान सरकार प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेते आणि ते पूर्ण झाले की लगेचच नवीन प्रकल्प हाती घेते, असे त्यांनी सांगितले. आजचे प्रकल्प हे या कार्यसंस्कृतीचे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि विकासकामांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
केंद्र सरकार “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्रानिशी पुढे वाटचाल करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.स्वातंत्र्य मिळून इतकी दशके लोटल्यानंतरही दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या भागात एकही वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे युवकांना डॉक्टर होण्यासाठी देशाच्या इतर भागात जावे लागते याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा संधी मिळविणाऱ्या आदिवासी समाजातील तरुणांची संख्या अगदी नगण्य आहे, तर अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी या भागातील लोकांच्या इच्छा आणि आकांक्षांकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले . 2014 नंतर सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारच्या सेवाभिमुख दृष्टीकोन आणि समर्पणामुळेच दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीला पहिली राष्ट्रीय शैक्षणिक वैद्यकीय संस्था किंवा नमो वैद्यकीय महाविद्यालय मिळाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
“आता दरवर्षी या भागातील अंदाजे 150 युवकांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळेल”,असे सांगत पंतप्रधान म्हणाले की नजीकच्या काळात या प्रांतातून अंदाजे 1000 डॉक्टर्स तयार केले जातील. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या एका मुलीच्या बातमीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला , ज्यात म्हटले होते की केवळ तिच्या कुटुंबातलीच नव्हे तर संपूर्ण गावात वैद्यकीय शिक्षण घेणारी ती पहिलीच आहे.वैद्यकीय महाविद्यालयामुळे स्थानिक वैद्यकीय सुविधांवरील ताण कमी होईल असे पंतप्रधान म्हणाले. ” 300 खाटांचे नवीन रुग्णालय बांधले जात आहे आणि नवीन आयुर्वेदिक रुग्णालयासाठी परवानगी देण्यात आली आहे” असे ते पुढे म्हणाले.
“आज लोकार्पण करण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे दरवर्षी 300 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळेल” असे पंतप्रधान म्हणाले. दादरा आणि नगर हवेलीमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था कॅम्पस सुरू करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दमणमधील एनआयएफटी सॅटेलाइट कॅम्पस, सिल्वासा येथील गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कॅम्पस, दीवमधील आयआयआयटी वडोदरा कॅम्पसचा त्यांनी उल्लेख केला. “मी प्रत्येक विद्यार्थ्याला आश्वासन देतो की आमचे सरकार त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही”, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.“दादरा, दीव आणि नगर हवेली ही तीन स्थळे, किनारी पर्यटनात, दैदीप्यमान स्थळे म्हणून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत,” असे सांगत पंतप्रधानांनी दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या स्थळांमध्ये महत्वाची पर्यटन स्थळे म्हणून विकसित होण्याच्या क्षमता अधोरेखित केल्या. आणि जेव्हा सरकार, भारताला जगातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशा वेळी हे अधिकच महत्वाचे ठरते, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी सांगितले की सरकार ‘तुष्टीकरणावर नाही तर ‘संतुष्टीकरणावर’ म्हणजेच सर्वांच्या समाधानावर भर देत आहे. “वंचित, उपेक्षित समाजाच्या गरजांना प्राधान्य देणे, ही गेल्या नऊ वर्षातील सुप्रशासनाची ओळख ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.” समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार अतिशय जलद गतीने काम करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. जेव्हा, सरकार स्वतः नागरिकांच्या दाराशी पोहोचते, आणि सरकारी योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात, तेव्हा भ्रष्टाचार आणि भेदभाव आपोआप कमी होतो, असे पंतप्रधान म्हणाले. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे केंद्र सरकारच्या विविध योजनांची जवळपास 100 टक्के अंमलबजावणी होत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. “सर्वांच्या प्रयत्नातून विकसित आणि समृद्ध भारताचा संकल्प साध्य होईल”, अशा विश्वास पंतप्रधानांनी शेवटी व्यक्त केला.
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दादरा आणि नगर हवेलीच्या खासदार कलाबेन देलकर आणि कौशांबीचे खासदार विनोद सोनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

