भिवंडी येथे इमारत कोसळून भीषण दुर्घटना

तीन जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

भिवंडी -एम एन सी न्यूज नेटवर्क – भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरातील पारसनाथ कंपाऊंड येथील वर्धमान नामक तीन मजल्याची इमारत शनिवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली.
यात तिघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना
उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ३० ते ४० जण अडकल्याची शक्यता असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली.

तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंडमधील ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक केलेली गोदाम असलेली तीन मजली
इमारत आहे. शनिवारी सकाळी ११.४० वा. अचानकपणे इमारत कोसळली. त्यामुळे गोदामाच्यावर इमारतीमध्ये राहणारे व गोदामात काम करणाऱ्या कामगारांनी जोरदार आरडाओरडा सुरू केली. मात्र तोपर्यंत सारे मातीच्या ढिगाऱ्याखाली
दबले गेले होते. या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दल एनडीआरएफचा जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले.